माळेगाव – बारामती तालुक्यातील पवईमाळ-पणदरे येथील श्रद्धा वैशाली प्रवीण मुळीक (वय २५) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठी निवड झाली असून, त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रद्धा मुळीक यांनी प्राथमिक शिक्षण SVPM (Shivnagar Vidya Prasarak Mandal) English Medium School येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील College of Agriculture येथून M.Sc. Agriculture पदवी संपादन केली. त्यांचे विशेषीकरण Plant Pathology या विषयात आहे.
कृषी विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रद्धा यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी स्व-अध्ययनाच्या माध्यमातून केली. सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध तयारी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले.

श्रद्धा यांच्या यशामागे कुटुंबीयांचा मोलाचा पाठिंबा आणि प्रोत्साहन लाभले. त्यांच्या यशाबद्दल आई-वडील प्रवीण मुळीक व वैशाली मुळीक यांनी समाधान व्यक्त केले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने श्रद्धा मुळीक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कृषी शिक्षणाची पार्श्वभूमी असतानाही स्व-अध्ययनाच्या बळावर मिळविलेले हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.