या दोन महिन्यांच्या स्पर्धेत देशभरातील १० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. पुरेशी झोप घेणे, झोपण्याची नियमित वेळ पाळणे आणि दर आठवड्याला दिलेली आव्हाने पूर्ण करणे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धकांना ६० दिवसांच्या कालावधीत आपल्या झोपेच्या वेळेची आणि गुणवत्तेची नोंद ठेवावी लागत होती. त्यानुसार त्यांना गुण दिले जात होते.
मुंबई : दिवसभर पुरेशी झोप घेणे आणि त्यासाठी लाखो रुपये मिळवणे, ही कल्पना ऐकायला काहीशी अविश्वसनीय वाटेल. मात्र, मुंबईतील जिनिया चॅटर्जी हिने ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. सलग ६० दिवस झोपण्याच्या अनोख्या स्पर्धेत जिनियाने बाजी मारली असून, तिला तब्बल ९.६ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. वेकफिट या कंपनीने आयोजित केलेल्या ‘स्लीप इंटर्नशिप’च्या पाचव्या पर्वाची ती विजेती ठरली आहे.